पुण्यात गेल्या हप्ताभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात अनेक विकास कामांचे उद्धघाटन होणार होते. मात्र, पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता हा कार्यक्रम येत्या रविवारी (२९ सप्टेंबर) ‘ऑनलाइन’ स्वरूपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते (व्हर्चुअली) शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजन येत्या रविवारी, दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी होणार आहे.’
२६ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांकडून शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. तसेच पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेटच्या भूमिगत मेट्रोचा लोकार्पण सोहळा देखील पार पडणार होता. यासाठी काल पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठीची जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. तसेच एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती.
मात्र, पुण्यातल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. मोदी यांचा दौरा पुढे गेल्याने जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचे उद्घाटन आणि स्वारगेट-कात्रज मार्गिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे देखील ढकलण्यात आला.
Hon. PM Shri. Narendra Modi ji will be inaugurating the Shivajinagar District Court – Swargate stretch of Pune Metro and laying the foundation stone of Swargate – Katraj stretch virtually, on 29th September.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते (व्हर्चुअली)…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 26, 2024
मात्र, मोदी यांचा दौरा रद्द होऊन मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. प्रवाशांसाठी सर्व सुविधा सज्ज असताना, हा प्रकल्प आणखी किती लांबणीवर टाकणार, अशी चर्चा सुरू झाली. तसेच विरोधकांकडून देखील यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर, रात्री उशिराने उद्घाटन-भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी ऑनलाइन स्वरूपात घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.