Mahavikas Aaghadi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) गुरुवारचा पुणे दौरा मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील अनेक विकास कामांचे उद्धघाटन होणार होते. तसेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण देखील होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होतं. मात्र, पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
काल मोदींच्या स्वागतासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानंतर मात्र, विरोधकांकडून सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली, मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
तसेच नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली. यानंतर या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली. रविवारी २९ तारखेला लोकार्पण होणार असून, ऑनलाइन स्वरूपात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, याआधीच महविकास आघाडीच्या नेत्यांकडून आजच पुणे मेट्रो सुरु करा यासाठी आंदोलन करण्यात आले. आज सकाळपासूनच हे आंदोलन सुरु होते, यावेळी लाल फित कापत आंदोलकांनी लोकार्पण देखील केलं आणि आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार असल्याचे म्हणत आक्रमक झाले. मोदींनी कालच मेट्रोचं ऑनलाईन पध्दतीने का लोकार्पण केलं नाही असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी जोवर मेट्रो सुरू होत नाही, तोवर आम्ही इकडून हलणार नाही, अस म्हंटल होत, मात्र, आता पोलिसांकसून हे आंदोलन शांत करण्यात आले आहे, यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता, पोलिसांना हे आंदोलन शांत करण्यात यश आले असून, आंदोलक परतले आहेत.