महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. ही महिला पास न काढताच सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात (Mantralaya) शिरली आणि तिने कार्यालयाची तोडफोड केली आहे. पोलीस या महिलेचा शोध घेत असून ही महिला कोण होती हे अद्याप समोर आले नाही.
या महिलेने कार्यालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची असलेली पाटी देखील फेकून दिली होती. कार्यालयात असलेल्या कुंड्या देखील या महिलेने फेकलेल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली होती. परंतु आता या घटनेने मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयच सुरक्षित नाही का ? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. तसेच या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.
पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेवरूनच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जवळच्याच लोकांपासून धोका आहे का, हे त्यांनी तपासून पाहावे, असे भाष्य केले आहे. तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे लोकाभिमुख नेते असून त्यांच्याकडे लोकशाही पद्धतीने मागण्या मांडल्या पाहिजेत असे केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात उपस्थित होते का? याची माहिती अद्याप समोर आली नाही.