Israel Hezbollah War : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. हमासप्रमाणे, हिज्बुल्लाहला देखील पूर्णपणे नष्ट करणार असल्याचे त्यांनी बोलले आहे. जोपर्यंत हिजबुल्लाह लेबनॉनमधून रॉकेट डागणे थांबवत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच राहील, अशी धमकी त्यांनी यावेळी दिली आहे. नेतान्याहू हे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सभेत सहभागी होण्यासाठी आले होते, तेथे त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एक नवीन हल्ला केला, ज्यामध्ये हिजबुल्लाहचा आणखी एक वरिष्ठ कमांडर मारला गेला, त्यानंतर हिजबुल्लाहने प्रत्युत्तर देत इस्त्रायली सीमेवर एकामागोमाग रॉकेट डागले. या युद्धाच्या सुरुवातीपासून इस्रायल आणि लेबनॉनच्या सीमा भागात राहणाऱ्या लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.
अमेरिका इस्रायलला मदत करण्यास तयार
इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीय देश प्रयत्न करत आहेत. अलीकडेच फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, अमेरिका आणि फ्रान्स, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, युनायटेड नेशन्समधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी बुधवारी स्पष्टपणे सांगितले की, ‘आम्ही राजकीय नेत्यांना या परिस्थितीवर तोडगा काढण्यास प्रथम प्राधान्य देऊ, परंतु जर ते अयशस्वी झाले तर आम्ही आमच्या सर्व उपलब्ध माध्यमांचा वापर करू. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत इस्रायलचे राजदूत बोलत होते.