बांगलादेशच्या(Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. बांगलादेशच्या राजकारणात अतिशय खळबळ उडाली आहे. आता भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवर देखील परिणाम झाला आहे. या घटनेनंतर बांगलादेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत. नुकतेच भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्हिसा सेवा काही कालावधीसाठी थांबवण्यात आल्या होत्या. तसेच ऑगस्ट 2024 मध्ये 400 पेक्षा जास्त बांगलादेशी व्हिसा अर्जांची तपासणी भारतीय केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.
केवळ विद्यार्थ्यांसाठी आणि वैद्यकीय हेतूंसाठी सध्या बांगलादेशातील भारतीय व्हिसा केंद्रे व्हिसा अर्जांवर प्रक्रिया करत आहेत. तसेच पीआरसी अंतर्गत ( प्री-रेफरल चेक ) व्हिसा अर्जांची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. याच्या माध्यमातून अर्जदाराची संपूर्ण माहिती आणि पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरक्षा आणि गुप्तचर संस्था करत आहेत.
दरम्यान, भारताकडून 15 श्रेणींचे व्हिसा बांगलादेशी नागरिकांना दिले जातात. “तात्काळ सेवा” व्हिसाचा देखील यामध्ये समावेश असतो. 45 दिवसांपर्यंत व्हिसा मुक्त प्रवासाची तरतूद भारत आणि बांगलादेशच्या राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट धारकांसाठी आहे. ही तरतूद भारत आणि बांगलादेश दरम्यान स्वाक्षरी केलेल्या सुधारित प्रवास व्यवस्थेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सरकारने भारताच्या बांगलादेशच्या सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) स्पष्ट आदेश दिले आहेत की वैध कागदपत्रे किंवा व्हिसाशिवाय कोणालाही देशात प्रवेश देऊ नये. तसेच सीमेवर अनधिकृतपणे घुसखोरी होऊ नये यासाठी अतिशय कडक पाळत देखील ठेवली जात आहे. सरकारकडून 5 ऑगस्टपासून बीएसएफ जवानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.