Hyderabad : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी तेलंगणाचे महसूल मंत्री पी. श्रीनिवास रेड्डी आणि इतर पाच ठिकाणी मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकले आहेत. कस्टम ड्युटीच्या कथित उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
श्रीनिवास रेड्डी यांचा मुलगा हर्ष रेड्डी यांच्याविरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या तक्रारीवरून मनी लाँड्रिंग प्रकरण उघडकीस आले. त्याच्यावर पाच कोटी रुपयांची सात घड्याळे खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याचे पेमेंट 100 कोटी रुपयांच्या हवाला आणि क्रिप्टो करन्सीने केले असल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी नवीन कुमार नावाच्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
नेमकं काय प्रकरण?
28 मार्च रोजी हैदराबादमधील एका कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीला समन्स पाठवण्यात आले होते. या कंपनीचे संचालक हर्षा रेड्डी आहेत. 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथील हाँगकाँगस्थित भारतीय मुहम्मद फहारदीन मुबीन यांच्याकडून दोन लक्झरी घड्याळे जप्त करण्यात आल्यावर तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घड्याळांची मूळ किंमत 1.73 कोटी रुपये आहे.
तपासानुसार, हर्षा रेड्डी यांनी आलोकम नवीन कुमार यांच्यामार्फत मुबीनकडून घड्याळे खरेदी केली होती. नवीन कुमार यांची १२ मार्च रोजी चौकशी करण्यात आली. नवीनने सांगितले की तो फक्त मुबीन आणि हर्षा यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करत होता. चौकशीनंतर, कस्टम्सने दावा केला की, व्यवहारासाठी हवाला मार्ग, क्रिप्टोकरन्सी आणि रोख रकमेद्वारे पैसे दिले गेले. मात्र, हर्षने हे दावे फेटाळून लावले.
दरम्यान, या छाप्याबाबत ईडीच्या अधिका-यांनी अद्याप कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही किंवा मंत्री किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.