जम्मू आणि काश्मीरच्या(Jammu and Kashmir) मुद्द्यावर अनेक देशांनी आतापर्यंत पाकिस्तानला साथ दिली होती. परंतु संयुक्त राष्ट्र महासभेत आता अनेक देशांनी या विषयावर बोलणे टाळले आहे. प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र महासभेत तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdoğan)यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले आहे. भारताकडून 2019 पासून काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आले आहे. तेव्हापासून तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन सतत भारतावर टीका टिप्पणी करत होते. परंतु आता संयुक्त राष्ट्र सभेत त्यांनी मौन धरले होते.
2019 पासून काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन सतत काही ना काही वक्तव्य करत होते. यावरून त्यांनी अनेकदा भारतावर जोरदार टीका देखील केली आहे. परंतु संयुक्त राष्ट्र सभेत यावेळी त्यांनी काश्मीर मुद्यावर एकही शब्द बोलले नसल्याने भारताचा हा विजयच आहे असे म्हटले जात आहे. “आम्हाला ब्रिक्स देशांसोबत आमचे संबंध विकसित करायचे आहेत. यामध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येतात” असे तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन न्यूयॉर्कमध्ये 79 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना म्हणालेले आहेत.
ब्रिक्सचा संस्थापक सदस्य भारत देश आहे. ब्रिक्सचे एकूण पाच संस्थापक सदस्य असून यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. मागील वर्षीपासून ब्रिक्सने समूह विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार 1 जानेवरी 2024 पासून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) हे देश देखील ब्रिक्सचे सदस्य बनलेले आहेत. दरम्यान, आता रशियाच्या कजानमध्ये ब्रिक्स नेत्यांचे 22 ते 24 ऑक्टोंबरला शिखर सम्मेलन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.