महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी घडला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. ही महिला पास न काढताच सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात (Mantralaya) शिरली आणि तिने कार्यालयाची तोडफोड केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करणारी ही महिला कोण होती याचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव धनश्री सहस्त्रबुद्धे आहे. ही महिला दादरमधील एका सोसायटीमध्ये राहते. या महिलेच्या आई वडिलांचे निधन झाले असून दादारमध्ये ती एकटीच राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दादरमधील सोसायटीत देखील ती चाकू घेऊन फिरत असते.तसेच लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असतानाचे देखील तिचे व्हिडीओ समोर आले आहेत. पोलिसांना सीसीटीव्हीमार्फत या महिलेची ओळख पटवण्यात यश आले आहे.
ही महिला मेंटली डिस्टर्ब आहे असे दादरमधील ज्या सोसायटीमध्ये ही महिला राहते तेथील लोकांचे म्हणणे आहे. ही महिला तिच्या घराचे दार उघडण्यास नकार देत असल्याने पोलिसांना तिचा जबाब घेण्यास अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मला सलमान खानचा नंबर द्या मला त्याच्याशी लग्न करायचे आहे असे देखील ही महिला म्हणत असते. याआधी भाजप कार्यालयात देखील या महिलेने असाच धुमाकूळ घातला होता.
दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर जे पोलीस असतात त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण या महिलेकडे पास नसताना देखील ती सचिव गेटने आतमध्ये कशी गेली ? तिला अडवले का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.