मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीचा (Mumbai University Senate Election 2024 ) निकाल काल रात्री जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेला ((Yuvasena)) भरघोस यश मिळाले आहे. ठाकरेंच्या युवासेनेने या निवडणुकीच्या 10 पैकी 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणुकीतील विजयानंतर कार्यकर्त्यांनी सिनेट तो झाकी है, विधानसभा अभि बाकी है अश्या घोषणया दिल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या या निवडणुकीत भाजप प्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP चा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. काल (27 सप्टेंबर ) या निवडणूकीची मतमोजणी करण्यात आली आहे. ठाकरेंची युवासेना पहिल्यापासूनच आघाडीवर होती. युवा सेनेने 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर दहाव्या जागेवर निवडून येणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. दहाव्या जागेचा निकाल रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी लागलेला आहे. आज मातोश्रीवर दुपारी बारा वाजता सर्व विजयी उमेदवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) भेट घेणार आहेत.
ही निवडणूक जिंकलेल्या एका सदस्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. आमच्यासाठी हा निकाल औपचारिक होता. दोन वेळा ही निवडणूक रद्द करण्यात आली होती परंतु आम्ही ही निवडणूक जिंकून येणार असा विश्वास आम्हाला होता कारण जनतेने कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
या निवडणुकीत भाजपप्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आणि आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने प्रत्येकी 10 उमेदवार दिले होते. इतर आठ उमेदवार धरून या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार उभे राहिले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी युवासेनेच्या निवडून आलेल्या 10 उमेदवारांना प्रमाणपत्र दिले आहे. प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव, किसन सावंत, शितल शेठ देवरुखकर, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, मयुर पांचाळ , स्नेहा गवळी यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.
या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी मतदान केले त्यांचे मनापासून आभार. पुनः एकदा 10 पैकी 10 जागा निवडून आल्या आहेत. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल शिवसेना आणि युवासेनेकडून धन्यवाद. सिनेट निवडणुकीत निकालाची आम्ही फक्त पुनरावृत्ती केली नसून आमची कामगिरी देखील सुधारली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.