सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर(Ujjain) मंदिराबाहेरची भिंत पावसामुळे कोसळली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. काल (27 सप्टेंबर ) सायंकाळी अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली आहे. प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ बांधलेली भिंत कोसळली आहे अशी माहिती मिळालेली आहे.
भिंत कोसळल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी आले होते. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्य करणे कठीण झाले होते. सध्या महाकाल मंदिराचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. भिंतीखाली बरेच जण अडकल्याची शक्यता देखील वर्तवली जात असून याचा शोध घेण्याचे काम रेस्क्यू टीमकडून सुरू आहे.
मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असून अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.