देशभरात आज दिवंगत गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची ९५ वी जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील लता मंगेशकर यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. लता मंगेशकर यांचे स्मरण करत पंतप्रधानांनी एक्स अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. “लता दीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. तिच्या भावपूर्ण गाण्यांमुळे ती लोकांच्या हृदयात आणि मनात कायम जिवंत राहील. लता दीदी आणि माझा एक खास बंध होता. तिचा स्नेह आणि आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने इतिहासातील सर्वात जास्त रेकॉर्ड नावावर असलेली कलाकार म्हणून 1974 मध्ये मान्यता दिली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही लता मंगेशकर यांचे नाव नोंदविले गेले आहे. लता मंगेशकर यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्यांनी 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी रेकॉर्ड केलेली आहेत. त्यांच्या नावावर अनेक भाषांमधील 25,000 हून अधिक गाण्यांचा संग्रह आहे. तसेच आज देखील त्यांचा मधुर आवाज कलाकारांच्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
लता मंगेशकर यांनी 1948 ते 1987 दरम्यान किमान 30,000 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.