गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार असून आतापर्यंत या योजनेचे दोन हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता या योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची सर्वजण वाट बघत आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक मदत होण्यास सुरुवात झालेली आहे.
अतिशय कमी कालावधीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचा तिसरा हफ्ता 29 सप्टेंबर रोजी जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या योजनेचा पहिला आणि दूसरा हफ्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात अद्याप या योजनेचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या सर्व महिलांना 4500 रुपये देण्यात येणार आहेत. या महिलांच्या खात्यात 4500 रुपये येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात एकूण 2 लाख 31 हजार 294 नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. परंतु ज्या महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नाहीत अशा महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्टपर्यंत होती परंतु सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2024 केलेली आहे.