Hassan Nasrullah Death : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान हिजबुल्ला नेता हसन नसरुल्ला याचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल लेबनॉनवर हल्ला करत आहे. प्रत्युत्तरात हिजबुल्लाह देखील इस्रायलवर हल्ला करत आहे. दरम्यान, या हल्ल्यात हिजबुल्ला नेता हसन नसरुल्ला याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.
शनिवारी येथील अनेक भागांमध्ये लोकांनी इस्रायलविरोधात निदर्शने केली. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हिजबुल्लाच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हसनाबाद, रैनावरी, सैदाकडल, मीर बिहारी आणि अशबाग भागात लहान मुलांसह मोठ्या संख्येने लोक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले.
आंदोलकांनी इस्रायल आणि अमेरिकाविरोधी घोषणा दिल्या आणि लेबनीज अतिरेकी गटाच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा निषेध केला, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रदर्शनाचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निषेधाच्या समर्थनार्थ नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आगा रुहुल्ला आणि पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांनी आणल्या जम्मू-काश्मीर मधील सभा देखील रद्द केल्या.
इस्रायली लष्कराने लेबनॉनची राजधानी बेरूतमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. इस्त्रायली सैन्याने सांगितले की, बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात हिजबुल्लाचे मुख्यालय हे लक्ष्य होते, जे निवासी इमारतींच्या खाली भूमिगत होते.
शिवाय, आता इस्रायली लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात असेही म्हंटले आहे की, कालच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्ला यांच्यासह अनेक कमांडर मारले गेले आहेत.
तुमच्या माहितीसाठी, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरु असलेल्या युद्धात हसन नसरल्लाह महत्त्वाची भूमिका बजावत होता.