Nepal Flood : नेपाळमध्ये सध्या सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे येथील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. तसेच या पुरात आतापर्यंत किमान ११२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नेपाळमधील तराई या भागात पूर आला असून, काठमांडू खोऱ्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, नेपाळमधील तराई भागात कोसळत असलेल्या पावसामुळे गंडक आणि कोसी नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे येथील धोका कायम आहे, तसेच नागरिकांना सर्तकतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पूर आणि भूस्खलनात ११२ जणांचा मृत्यू
गुरुवारपासून नेपाळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नेपाळ पोलिस उपप्रवक्ते बिश्वो यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील पूरस्थितीमध्ये आतापर्यंत ११२ जणांचा मुत्यू झाला आहे. यापैकी काठमांडू खोऱ्यात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या पुरात 60 जण जखमीही झाले आहेत. तर देशभरात एकूण ७९ लोक बेपत्ता आहेत. तर 3,000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, धाडिंग जिल्ह्यातील जियापाल खोला येथे भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन वाहनांमधून पोलिसांनी 14 मृतदेह बाहेर काढले आहेत. येथे बचाव पथक काम करत असून, याठकाणी अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
226 घरे पाण्याखाली
एका प्रसिद्ध वृत्तानुसार, पुरात मृत्युमुखी पडलेल्या ११२ लोकांपैकी ३४ काठमांडू खोऱ्यातील आहेत. तसेच याठिकाणचे 40 लोक बेपत्ता आहेत, तर येथील 1,000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच काठमांडूमध्ये 226 घरे पाण्यात बुडाली आहेत आणि नेपाळ पोलिसांनी बाधित भागात सुमारे 3,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बचाव पथक तैनात केले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नेपाळमध्ये 44 ठिकाणी मुख्य महामार्ग रोखण्यात आले आहेत.
नेपाळमधील पावसाचा बिहारलाही धोका
दुसरीकडे, नेपाळ लगतच्या बिहारमध्ये देखील अनेक जिल्ह्यांना पुराचा धोका आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत बिहारमधील १३ जिल्ह्यांमध्ये भीषण पूर येण्याची शक्यता आहे. नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये वाहत येणाऱ्या गंडक, कोसी, महानंदा आणि इतर नद्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी क्षेत्रातील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.