Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat ) या कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. आज ‘मन की बात’ च्या 114 व्या भागात याबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी (Narendra Modi) भावुक झालेले दिसून आले. यासोबतच त्यांनी अनेक ठिकाणी राबवण्यात आलेल्या योजनांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी राबवण्यात येणाऱ्या एक-एक योजनांचे नाव घेतले आणि त्या-त्या व्यक्तींना कौतुकाची थाप दिली.
‘मन की बात’ला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा भाग मला भावूक करणारा आहे…याचे कारण म्हणजे आपण या कार्यक्रमाला 10 वर्षे पूर्ण करत आहोत…आपल्या देशात अनेक प्रतिभावान लोक आहेत, त्यांच्यात देश आणि समाजाची सेवा करण्याची तळमळ आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेतल्याने मला ऊर्जा मिळते. ‘मन की बात’च्या या दीर्घ प्रवासात अनेक टप्पे आले, जे मी कधीही विसरू शकत नाही. ‘मन की बात’चे करोडो श्रोते हे आमच्या प्रवासाचे असे सोबती आहेत, ज्यांच्याकडून मला सतत पाठिंबा मिळत राहिला.’
‘मन की बात’ च्या 114 व्या भागात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांपासून देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. “हा पावसाळा आपल्याला ‘जलसंधारण’ (जलसंधारण म्हणजे जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास ) किती महत्त्वाचा आहे याची आठवण करून देतो…याचेच एक उत्तम उदाहण म्हणजे झाशीतील काही महिलांनी घुरारी नदीला नवसंजीवनी दिली आहे. या महिला बचतगटांशी निगडित असून त्यांनी ‘जल सहेली’ बनून या मोहिमेचे नेतृत्व केले आहे.
पीएम मोदी म्हणाले, “मला मध्य प्रदेशातील दोन अतिशय प्रेरणादायी प्रयत्नांची माहिती मिळाली. येथे दिंडोरीतील रायपुरा गावात मोठा तलाव बांधल्याने भूजल पातळी चांगलीच वाढली आहे. याचा लाभ या गावातील महिलांना मिळाला. येथे ‘शारदा उपजीविका बचत गट’शी संबंधित महिलांना मत्स्यपालनाचा नवा व्यवसायही मिळाला. पंतप्रधान म्हणाले, अशा शेकडो जलाशयांच्या (कृत्रिम तलाव) निर्मिती आणि पुनरुज्जीवनात महिलांनी सक्रिय योगदान दिले आहे. यामुळे या भागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही पसरला आहे. पुढे त्यांनी असेच काहीसे प्रकल्प सांगितले ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.
‘थँक नेचर’ मोहिम
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थँक नेचर मोहिमेचे कौतुक करत म्हंटले, “उत्तराखंडमधील ‘झाला’ या गावातील तरुणांनी आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. ते त्यांच्या गावात ‘थँक नेचर’ मोहीम राबवत आहेत. या अंतर्गत गावात दररोज दोन तास स्वच्छता केली जाते. गावातील गल्ल्यांमध्ये विखुरलेला कचरा गोळा केला जातो आणि गावाबाहेर निश्चित केलेल्या ठिकाणी टाकला जातो…”
‘एक पेड माँ के नाम’ मोहीम
तसेच एक पेड माँ के नाम या मोहिमेबद्दल बोलताना ते म्हणाले, “जेव्हा सामाजिक कार्यासाठी अनेक लोक एकत्र येतात तेव्हा आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘एक पेड माँ के नाम’ ही मोहीम. ही एक अप्रतिम मोहीम आहे जी लोकसहभागाचे असे उदाहरण खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. पर्यावरण रक्षणासाठी सुरू झालेल्या या मोहिमेत देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी एकत्र येऊन चमत्कार केले आहेत…”
‘संथाली’ मोहीम
पुढे पंतप्रधान नरेंद्र संथाली मोहिमेचे देखील कौतुक केले, “डिजिटल इनोव्हेशनच्या मदतीने आपल्या ‘संथाली’ भाषेला नवीन ओळख देण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये राहणाऱ्या संथाल आदिवासी समाजातील लोक संथाली भाषा बोलतात. भारताव्यतिरिक्त बांगलादेश, नेपाळ आणि भूतानमध्येही संथाली भाषिक आदिवासी समुदाय आहेत…”