Pune News : २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा हा पावसामुळे रद्द करण्यात आला. गुरुवारी मोदींच्या हस्ते पुण्यातील अनेक विकास कामांचे उद्घाटन होणार होते, मात्र दौरा रद्द झाल्यानंतर हा कार्यक्रम रविवारी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. आज दुपारी पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण केले.
सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
ऑनलाईन आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार, म्हणत, पावसामुळे पुणे दौरा रद्द करावा यात माझे नुकसान आहे. ज्या शहराला देशात एक वेगळे महत्त्व आहे तिथे मला येता आले नाही.’ असं ते म्हणाले
पुढे म्हणाले, आजपासून स्वारगेट मार्गावर मेट्रो धावायला लागेल. सावित्रीबाई यांचे स्मारक याचे सुद्धा आज भूमिपूजन करण्यात आले. पुढे त्यांनी सोलापूर विमानतळ याबद्दल देखील वक्तव्य केले, विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना फळ मिळाले असून सोलापूर विमानतळाचे काम सुरु आहे. आता पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लोक सोलापूरला थेट विमानाने जाऊ शकतील.’
Speaking at launch of various projects in Maharashtra. These will give a boost to urban development and significantly add to 'Ease of Living' for the people. https://t.co/0hXLSIJTGN
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
महाराष्ट्र राज्याला नवीन लक्ष्य ठेवण्याची गरज आहे. आज पुणे ज्या वेगाने वाढते आहे त्यात पुण्याची लोकसंख्या वाढतेय. या लोकसंख्याच सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे. महायुतीची सरकार हाच विचार घेऊन दिवस रात्र काम करत आहे. पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती पण दुर्दैवी आहे की शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा आभाव राहिला असंही ते यावेळी म्हणाले.
मोदींच्या हस्ते ‘या’ विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ, स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन.