Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. दरम्यान, त्यांनी नागपूरमध्ये (Nagpur) असेच काहीसे व्यक्तव्य केले आहे जे सध्या चर्चेत आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांना सबसिडीच्या भरवशावर राहू नका असा सल्ला दिला. ते नागपुरात आयोजित ‘Advantage Vidarbha’ या उद्योजकांसाठीच्या कार्यक्रमात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
“कोणत्याही पक्षाचे सरकार असो. सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. सरकार ही विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते. त्यामुळे उद्योजकांनी यांच्या लफड्यात पडू नये. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या. पण सबसिडी कधी मिळेल याचा काही भरवसा नाही. माझ्या मुलाने सांगितले की ४५० कोटी रुपये अनुदान मिळालं आहे. मुलाने विचारलं की अनुदान कधी मिळणार. त्याला म्हटलं देवाला प्रार्थना कर. कारण काही भरवसा नाही की अनुदान मिळणार की नाही.
पुढे, अनुदानाविषयी बोलताना नितीन गडकरी यांनी महायुती सरकारच्या सर्वात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘उद्योजकांनी सरकारच्या अनुदानाच्या पैशांवर अवलंबून राहू नये कारण सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर मोठा खर्च करावा लागत आहे. यामुळे अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही.’
‘लाडकी बहीण’ या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर सरकारला मोठा निधी खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत इतर योजना किंवा अनुदान योजनांना मिळणाऱ्या निधीत घट होत आहे. म्हणून उद्योगांना शासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःच्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहणे गरजेचे आहे, असा सल्ला नितीन गडकरींनी यावेळी दिला.