विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Elections 2024 ) जम्मू काश्मीरमध्ये उद्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभेच्या एकूण 90 जागा जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आहेत. उद्या शेवटच्या टप्प्यात 40 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण 415 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. जम्मू काश्मीरमधील जम्मू, उधमपूर, सांबा, कठुआ, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा या 7 जिल्ह्यांमध्ये उद्या मतदान होणार आहे.
दरम्यान, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून एकूण ६१.३८ टक्के मतदान करण्यात आले आहे तर , दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबरला ५७.३१ टक्के मतदान झालेले आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
सर्व पक्ष जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाची तयारी करत आहेत. परंतु आता केंद्रशासित प्रदेशात प्रचाराला परवानगी दिली जाणार नाही. भाजपकडून या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली होती. त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी देखील प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे. तसेच इतर पक्षांनी देखील जम्मू काश्मीरमध्ये जोरदार प्रचार केलेला आहे. यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हे देखील प्रचार करण्यास जम्मू काश्मीरमध्ये उपस्थित होते.
दरम्यान, आता शेवटच्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी किती टक्के मतदान होणार तसेच या विधानसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.