Rajnath Singh : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ (Rajnath Singh) सिंग यांनी रविवारी दक्षिण काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रॅलीत संबोधित करताना पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. हा नवा भारत आहे हे पाकिस्तानने विसरू नये.
या रॅलीत संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवरही भाष्य केले आहे. ‘जर पाकिस्तानने भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असते तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मागितलेल्या बेलआउट पॅकेजपेक्षा मोठे बेलआउट पॅकेज दिले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014-15 मध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जाहीर केलेले विशेष पॅकेज आता 90,000 कोटी रुपयांवर आहे. संपूर्ण पाकिस्तान जेवढी रक्कम IMF कडे मागत आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरला दिला आहे.
राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, ‘हम दोस्त बदल सकते हैं, लेकिन पड़ोसी नहीं बदल सकते.’ ‘जर पाकिस्तान आणि भारतात चांगले संबंध असते तर आम्ही आयएमएफ पेक्षाही जास्त निधी दिला असता. परंतु पाकिस्तान (Pakistan) प्रदीर्घ काळापासून पैशांचा दुरुपयोग करत आहे. पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाची फॅक्टरी चालवण्यासाठी दुसऱ्या देशांना पैसे मागत आहे.
पुढे बोलताना त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला. ‘सीमेपलीकडे बसून भारताचे नुकसान करण्याचा कट रचणाऱ्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की, जर कोणी मोठा दहशतवादी भारतात दहशदीच्या घटना घडवत असेल तर, दहशतवादी जिथे बसले असतील तिथे जाऊन त्यांना मारले जाईल. हा नवा भारत आहे हे पाकिस्तानने विसरू नये. हा भारत सीमेपलीकडे जाऊन दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईही करू शकतो. असा थेट इशारा यावेळी संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे.
‘कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान दहशतीत आहे. काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तान नेहमीच आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही बळकट व्हावी, अशी त्यांची इच्छा नाही, पण त्यांचा दहशतवादाचा धंदा फार काळ चालणार नाही. असं देखील त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
तुमच्या माहितीसाठी, पाकिस्तानवर सध्या १३० अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. अशा स्थितीत आयएमएफने त्यांना केवळ ७ अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज दिले आहे, ज्यासाठी पाकिस्तानला आयएमएफ्या काही कडक अटी देखील मान्य कराव्या लागणार आहेत.