आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आली असताना सर्वच पक्ष निवडणूकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. सर्व पक्षांची जागावाटपावरून बैठक देखील होत आहेत. महायुतीमध्ये देखील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहेत. अस असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारामधील फलटण विधानसभा मतदार संघासाठी महायुतीचा उमदेवार जाहीर केलेला आहे. अजित पवारांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यांनी माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केलेली आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यात सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्धघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते. काही कारणांमुळे अजित पवारांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नव्हते. परंतु या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान फोन करून दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे.
अजित पवार यांनी या कार्यक्रमादरम्यान फोनवरुन संवाद साधला. यावेळी ते म्हणालेले आहेत की, विधानसभा निवडणुकीसाठी तुमचे गाव फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. या निवडणुकीत दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि सहकार्य करावे.
दरम्यान, फलटण, कोरेगाव तालुक्याला तसेच जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देण्यात येईल. माझ्या मायमाऊल्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी दिलेली आहे त्याचप्रमाणे भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही. माझ्या बोलण्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा असे देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.