आजच्या AI च्या युगात कधी काय होईल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी कलाविश्वातील अनेक कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या सोशल मिडियावर (Social Media )असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. गुजरातमधील(Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) 500 रुपयांच्या नोटेवर चक्क अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या एवजी चक्क अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो छापला गेल्याने सगळीकडे खळबळ उडालेली आहे. या प्रकारावर अनुपम खेर (Anupam Kher) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अनुपम खेर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर करत त्या खाली ‘लो जी कर लो बात! पाँच सौ के नोट पर गांधी जी की फोटो की जगह मेरी फोटो???? कुछ भी हो सकता है!’ असे लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी केलेल्या या पोस्ट खाली अनेकांनी कमेंट्स देखील केलेल्या आहेत. एका नेटकऱ्याने या नोटा बनविणारा जो कोणी आहे त्याच्यावर हसू की रडू असे म्हटले आहे तर दुसऱ्या नेटकऱ्याने फक्त 19-20 चा फरक आहे अशी देखील कमेंट केलेली आहे.
1 कोटी 60 लाख रुपये रोख द्यायचे होते. त्यासाठी एका व्यक्तीने बॅग भरून आणली होती परंतु त्या बॅगेत महात्मा गांधी यांच्या एवजी अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या बनावट नोटा आढळल्या आहेत अशी तक्रार अहमदाबाद येथील सराफा व्यापारी मेहुल ठक्कर यांनी केलेली आहे. त्यांनी बनावट नोटांबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून या घटनेबाबत अज्ञात व्यक्तिविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आता या नोटा नक्की कशा बनवल्या याच्या मागे कोण सूत्रधार आहे याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. या बनावट नोटांवर डिझाइनपासून रंग आणि आकारापर्यंत सगळ्या गोष्टी या खऱ्या दिसत आहेत. परंतु या नोटांवर ‘रिजर्व बॅंक ऑफ इंडिया’च्या जागी ‘रिसोल बॅंक ऑफ इंडिया’ लिहिलेले आहे. तसेच महात्मा गांधीच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आलेला आहे.