हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Elections 2024 ) तयारीत काँग्रेसने आज राहुल गांधींची(Rahul Gandhi) विजय संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेची सुरुवात आज सकाळी 11 वाजता अंबाला येथील नारायणगढ़ विधानसभा मतदार संघातून झाली आहे. यावेळी राहुल गांधींच्या सोबत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) देखील उपस्थित होत्या. या यात्रेमार्फत काँग्रेसकडून राज्यातील प्रमुख आणि जिंकून येऊ शकेल अशा जागांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
राहुल गांधींची ही संकल्प यात्रा 30 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये राहुल गांधी यमुनानगर आणि अंबाला येथे काही ठिकाणी भेट देतील. नंतर ते साहा आणि कुरुक्षेत्र जिल्ह्यातील दौऱ्यावर जातील, साहा आणि कुरुक्षेत्र जिल्ह्यात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) लाडवा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
या यात्रेमध्ये सात विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये नारायणगढ़, मुलाना, रादौर, लाडवा, सधौरा, पिपली आणि कुरुक्षेत्र यांचा समावेश आहे. राहुल गांधींच्या प्रचार मोहिमेला करनालच्या असंध येथून प्रारंभ झाला होता, जिथे त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीका केली.
कुरुक्षेत्रच्या थानेसर येथे राहुल गांधी या दौऱ्यादरम्यान एक मोठी रॅली देखील आयोजित करणार आहेत, ज्यात प्रदेश काँग्रेसचे नेते भूपेंद्र सिंह हुड्डा (Bhupinder Singh Hooda) आणि कुमारी सैलजा यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस 10 वर्षांनी हरियाणामध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हरियाणामध्ये एका जनसभेत राहुल गांधींवर चांगलीच जोरदार टीका केली होती. त्यांनी राहुल गांधींना ‘झूठ बोलण्याची मशीन’ असे म्हटले होते . तसेच काँग्रेस पक्षाची स्थिती ‘एक अनार आणि 100 बीमार’ आहे असे देखील भाष्य त्यांनी केले होते. दरम्यान, आता राहुल गांधींच्या संकल्प यात्रा मोहिमेला विरोधकांकडून प्रतिउत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.