अकोट : विदर्भातल्या अमरावतीसह अकोट तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जानवल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हादरे जाणवल्याची शहरात चर्चा होत आहे.
नॅशनल सेंटर ऑफ सेस्मोलॉजी या संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) 30 सप्टेंबर रोजी दु.1.37 वा. दरम्यान अमरावती व अकोला जिल्हयामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सदर भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात अमझरी व टेटु या गावाच्या दरम्यान आहे. रिश्टर स्केलवर याची नोंद 4.2 इतकी नोंदवली गेली आहे.
कंपन होत असताना दर्यापूर मार्गावरील काही उंच इमारती मध्ये वास्तवास असलेले रहिवासी मोकळ्या जागेत गोळा झाले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थपणाने देखील याबाबत दुजोरा दिला आहे की, जिल्ह्यात काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के येऊन गेले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ चुरणी, भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू, जळका हिरापूर, पूर्णा नगर आदी ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले. अंजनगाव सुर्जी शहरातील माळीपुरा, पाच पावली, बुधवार पेठ, शनिवार पेठ, पान अटाई, सावकारपुरा, बालाजी नगर, काठीपुरा भागात देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
मात्र, महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के जाणवल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. महाराष्ट्र हा अतिप्राचीन दगडाचा भाग आहे. मुळातच इथला खडक हा लाव्हारस थंड होऊन बनलेला आहे. पण तरीही भूकंपाचे धक्के येणे हे चांगल लक्षण नाही, असे बोलले जात आहे. आजच्याच दिवशी महाष्ट्रातील किल्लारीत देखील भूकंप आला होता.