मुंबईतील धारावी येथील बेकायदा मशीद पाडण्याचा कालावधी संपला असून, आता प्रक्रिया सुरू झाली आहे. बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम स्वतः मस्जिद समिती करत असून, त्यासाठी बीएमसीचे अभियंते मार्गदर्शन करत आहेत.
गेल्या आठवड्यात महापालिकेचे पथक मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आले असता लोकांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण वाढत असल्याचे पाहून ट्रस्टनेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. याअंतर्गत सोमवारी ट्रस्टनेच मशिदीवरील अनधिकृत बांधकाम पडण्यास सुरुवात केली.
गेल्या आठवड्यात मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यावरून मुंबईतील धारावीमध्ये तणाव पसरला होता. हा बेकायदा भाग पाडण्यासाठी बीएमसीची टीम आली होती. मात्र, जमावाने गोंधळ घातला. लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या वाहनासह अन्य काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती.
परिस्थिती पाहता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी बीएमसीच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर आता मशिदीच्या ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे.
मुंबईतील धारावी येथील 90 फिट रोडवरील 25 वर्षे जुनी सुभानिया मशीद बीएमसीने अनधिकृत घोषित केली होती. बीएमसी अधिकाऱ्यांच्या कारवाईपूर्वीच मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊन संपूर्ण रस्ता अडवला. ही मशीद खूप जुनी असल्याचे मुस्लिम समाजाच्या लोकांनी सांगितले. मुस्लिम समाजातील लोकांचे म्हणणे होते, ही मशीद खूप जुनी असून तिच्यावर कारवाई चुकीची आहे. मात्र, आज यावर कारवाईत करत स्वतः मस्जिद समिती अनधिकृत बांधकाम पाडत आहे.