Israel Attacks Lebanon : इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. इस्त्रायली सैन्याने (आयडीएफ) आता लेबनॉनमध्ये प्रवेश केला असून, लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेच्या ठिकाणांवर लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.
इस्त्रायली सैन्याने ‘ग्राउंड ऑपरेशन’ सुरु केले असून, या ऑपरेशनमध्ये हिजबुल्लाहची गुप्त ठिकाणे नष्ट केली जात आहेत. इस्त्रायने याबाबत आधीच इशारा दिला होता. आणि आज इस्त्रायली सैन्य मैदानावर उतरले आहेत. इस्त्रायने प्रथम लेबनॉनवर हवाई हल्ले करत हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले, आणि आता ‘ग्राउंड ऑपरेशन’ सुरु केले आहे.
1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये प्रवेश केला. याबाबत इस्रायली संरक्षण दलाने पोस्ट शेअर करत माहिती दिली. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी ठिकाणांविरुद्ध काही तासांपूर्वी कारवाई सुरू केली आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हिजबुल्लाह दहशवाद्यांच्या गुप्त ठिकाणांना लक्ष केले जात आहे.’
इस्रायली लष्कराने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन नॉर्दर्न ॲरोज’ असे नाव दिले आहे. 2006 मध्ये झालेल्या लेबनॉन युद्धानंतर इस्रायली सैन्य पहिल्यांदाच लेबनॉनमध्ये दाखल झाले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ‘इस्त्रायली सैन्यासोबत लढण्यासाठी हिजबुल्लाह पूर्णपणे तयार असल्याचे म्हंटले जात आहेत. आज सकाळपासूनच सीमावर्ती असलेल्या गावातून गोळीबाराचा आवाज येत आहे, तसेच हेलिकॉप्टर आणि ड्रोनचे देखील आवाज येत आहेत.
अमेरिकेलाही दिली माहिती
इस्रायलने अमेरिकेलाही या कारवाईची माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “इस्रायलने आम्हाला सांगितले आहे की, ते सीमेजवळील हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य करून मर्यादित भागात ‘ग्राउंड ऑपरेशन’ करणार आहेत.
तुमच्या माहितीसाठी इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यातील सुरु असलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाला मारला गेला, यानंतर त्यांच्यातील युद्ध आणखीनच पेटले. आणि आता इस्रायली सैन्य ग्राउंडवर उतरून कारवाई करत आहे, तसेच हिज्बुल्लाह देखील इस्रायली सैन्याविरुद्ध लढण्यास तयार असल्याचे म्हंटले जात आहे.