साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल (hospitalized) करण्यात आले. अचानक तब्येत खालावल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत हॉस्पिटल किंवा रजनीकांत यांच्या टीमकडून (Rajnikant Team) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही शस्त्रक्रिया कशासाठी करण्यात आली याबात अद्याप माहिती समोर आलेली नाही.
एका प्रसिद्ध वृत्तानुसार, रजनीकांत यांनी पोटदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईच्या अपोलो ग्रीम्स रोड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तुमच्या माहितीसाठी रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रवास करत आहेत. त्यांनी 30 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ चित्रपट निर्माते एसपी मुथुरामन आणि एव्हीएम सरवणन यांची देखील भेट घेतली होती. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रजनीकांत यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. 2020 च्या शेवटी अशाच एका घटनेमुळे, त्यांचा राजकारणातील प्रवेश थांबला होता. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. पण त्याच महिन्यात, त्यांनी आरोग्याचे कारण आणि साथीच्या आजाराचे कारण देत आपली योजना रद्द केली.
Tamil Nadu | Actor Rajinikanth was rushed to Apollo Greams Road Hospitals in Chennai on Monday late at night. He was taken to the hospital after complaining of severe stomach pain: Chennai Police
— ANI (@ANI) September 30, 2024
अभिनेते रजनीकांत यांचे चित्रपटसृष्टीत मोठे नाव आहे. त्यांनी तमिळ आणि हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. रजनीकांत यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरविले. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता म्हणून शेवेलियर शिवाजी गणेशन पुरस्कार देखील मिळाला आहे. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारादरम्यान, त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.