Bihar Flood : सध्या बिहारमधील (Bihar Flood) 19 जिल्हे पुराच्या तडाख्यात आले आहेत. नेपाळमधील 60 तासांच्या सततच्या पावसाचा परिणाम बिहारमध्येही दिसून आला. नेपाळ मध्ये पडलेल्या सलग पावसामुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली, त्याचा परिणाम बिहारवरही झाला. नेपाळमधून पाण्याचा दाब वाढल्याने बिहार, दरभंगा, सीतामढी, शिवहर, बेतिया येथील अनेक ठिकाणचे बंधारे आणि बागमती, कोसी आणि गंडक नद्यांवर बांधलेले बंधारे तुटले, त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आणि घरे पाण्याखाली गेली. बिहारच्या बहुतांश भागातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करत आहेत. जेणेकरून या आपत्तीतून लोकांचे रक्षण करता येईल.
पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण
मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारमधील सध्या परिस्थितीचे हवाई मार्गे सर्वेक्षण करत आहेत. आज ते पाटणा विमानतळावरून पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरीही उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तर बिहार आणि कोसीच्या भागांसह मिथिलांचलच्या अनेक भागांचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पाटण्यात अधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक घेणार आहेत. बिहार मधील गंभीर स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी स्वत: हवाई सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते उच्चस्तरीय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देणार आहेत.
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे बिहारच्या गंडक, कोसी, बागमती, महानंदा आणि इतर नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे बिहारच्या पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, अररिया, किशनगंज, गोपालगंज, शिवहर, सीतामढी, सुपौल, सिवान, मधेपुरा, मुझफ्फरपूर, पूर्णिया, मधुबनी, दरभंगा, सारण आणि सहरसा जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. त्याच वेळी, राज्यातील 55 ब्लॉकमधील 269 गावे आणि पंचायतींना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये 9.90 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार 4 जिल्ह्यांमध्ये 7 ठिकाणी बंधारे तुटले आहेत.
सीतामढी जिल्ह्यातील बेलसंड ब्लॉकमध्ये येणाऱ्या मधकौल आणि सौली रुपौली व्यतिरिक्त, रुन्निसैदपूर ब्लॉकच्या तिलकताजपूर आणि खडुआमध्ये बंधारा तुटला आहे. त्याचवेळी पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा ब्लॉकमधील खैरतवा गावात आणि शिवहर जिल्ह्यातील तारियानी ब्लॉकमधील छपरा येथे बंधारा तुटला आहे. याशिवाय दरभंगा जिल्ह्यातील किरतपूर ब्लॉकमधील भुबोल गावातही कोसी तटबंदीचा भाग तुटला आहे. याठिकाणी एनडीआरएफ सक्रिय असून, पुरात अडकलेल्या लोकांना बोटींच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी नेत आहेत. NDRF च्या एकूण 15 टीम आणि SDRF च्या 15 टीम पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
त्याच बरोबर इतर राज्यातून बोलवण्यात आलेल्या 6 पथकांना पूरग्रस्त भागात पाठवण्यात येत आहे. पूरग्रस्त भागात 127 सार्वजनिक स्वयंपाकघर केंद्रे कार्यरत आहेत आणि सुमारे 49400 लोकांना या सार्वजनिक स्वयंपाकघरातून अन्न पुरवले जात आहे. याशिवाय 71 मदत शिबिरेही चालवली जात आहेत. 54700 पूर निर्वासितांनी मदत शिबिरात आश्रय घेतला आहे.
पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि बाधित भागात पोहोचवण्यासाठी 800 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशा औषधांसह डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरलेल्या भागात 8 बोट ॲम्ब्युलन्स देखील कार्यरत आहेत, ज्यावर फिरती वैद्यकीय पथके तैनात आहेत. याशिवाय जनावरांसाठी औषधी व चाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.