उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एका विद्यार्थ्याला धनबादमधील आयआयटीमध्ये जागा देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांने फी भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत फी भरली नव्हती. तो शेवटच्या दिवशी फी भरायला गेला परंतु पोर्टल हँग झाल्याने त्याला फी जमा करता आली नाही. यामुळे त्याला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळाला नाही . हा विद्यार्थी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील खतौली गावातील असून त्याचे नाव अतुल असे आहे. याने झारखंडच्या विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क केला आणि याबाबत त्यांना मदत मागितली परंतु JEE परीक्षा IIT मद्रास द्वारे घेतली जाते, त्यामुळे त्याने चेन्नईमध्ये मदत घ्यावी असे त्याला त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) अतुलने मदत मागितली होती. आता सर्वोच्च न्यायालयाकडून अतुलला दिलासा मिळालेला आहे. ‘एवढी मोठी प्रतिभा केवळ पैशांच्या अभावी वाया जाता कामा नये,’असे वक्तव्य करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अतुलला आयआयटीमध्ये प्रवेश देण्यात यावा असे सांगितलेले आहे.
सर्वोच्च न्यायालयात अतुल कुमार या विद्यार्थ्यांच्या वकिलाने युक्तिवाद केला आहे. “आपल्या अशिलाचे वडील मेरठच्या कापड कारखान्यात मजूर असून ते दिवसाला ४५० रुपये मिळवितात. त्यांच्यासाठी १७ हजार ५०० रुपयांची तरतूद करणे अत्यंत कठीण आहे.यामुळे फी भरण्यास शेवटचा दिवस झाला. तसेच गावातील लोकांनी एकत्र येत शुल्कासाठीचे पैसे जमा केले होते.,” असे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलेले आहे.
यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अतुल कुमार याला प्रवेश दिला जावा, असे आदेश दिले आहेत. तसेच एका हुशार युवकाची प्रतिभा वाया जाऊ दिली शकत नाही असे देखील न्यायाधीशांनी सांगितलेले आहे.