India vs Bangladesh : कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवत दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने घातली खिशात घातली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांत पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि दोन दिवस एकही चेंडू खेळता आला नाही. सामना अनिर्णित राहील असे वाटत होते पण टीम इंडियाने हार न मानता आक्रमक फलंदाजी करून निकाल आपल्या बाजूने वळवून घेतला.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी फक्त 35 षटके खेळली गेली, पावसामुळे नंतरच्या दोन दिवसात एकही चेंडू खेळता आला नाही. मात्र, चौथ्या दिवशी खेळ झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवत बांगलादेशचा डाव 233 धावांवर आटोपला. प्रत्युत्तराच्या भारताने 285/9 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशने केवळ 146 धावा केल्या आणि 95 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने 98/3 धावा करून हे लक्ष्य सहज गाठले. यशस्वी जैस्वालनेही दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत 51 धावांची खेळी केली. तर विराट कोहली 29 धावा करून नाबाद राहिला.
घरच्या मैदानावर भारताचा सलग 18 वा मालिका विजय
मायदेशात टीम इंडियाचा दबदबा कायम असून कसोटी मालिका खेळण्यासाठी येथे येणाऱ्या संघांना गेल्या 12 वर्षांपासून निराशेचा सामना करावा लागत आहे. बांगलादेशचा पराभव करून भारताने घरच्या मैदानावर सलग १८व्या कसोटी मालिकेत विजय नोंदवला. टीम इंडियाला 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर शेवटच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता पण त्यानंतर कोणत्याही संघाला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली नाही. भारताने 2013 पासून 18 घरच्या मालिकांमध्ये 53 सामने खेळले आहेत आणि 42 जिंकले आहेत, तर फक्त 4 सामन्यांमध्ये भारताची निराशा झाली आहे. तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.