गेल्या काही दिवसांपासून राज्यात एका पाठोपाठ एक अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. अशीच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात घडली. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय (Nair Hospital) व वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थींनीचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्रोफेसरने या विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर निर्णय घेत डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांना दिलेले आहेत.
रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील. तसेच आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती’ या महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील समितीकडे याघटनेबाबतची तक्रार देण्यात आलेली आहे. याचसोबत मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत डीनची बदली करून उपयोग नाही तर आता निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे.