रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिंघम अगेन’ला (Singham Again) प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. हा चित्रपट ‘सिंघम’ फ्रेंचायझीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात करीना कपूर खान, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होणार आहे, मात्र या रिलीजपूर्वीच चित्रपटाने 200 कोटी रुपये कमावले आहेत.
रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’च्या थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टेलिव्हिजनसह एक मोठी डील केली आहे. या डीलमध्ये चित्रपटाच्या सॅटेलाइट, डिजिटल आणि म्युझिक राइट्सचा समावेश आहे. या सर्व राइट्सच्या विक्रीतून एकत्रित 200 कोटी रुपयेपेक्षा जास्त कमाई झालेली आहे.यामुळे आता ही अजय देवगन आणि रोहित शेट्टीसाठी सर्वात मोठी नॉन-थियेट्रिकल डील मानली जात आहे.
रोहित शेट्टीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन नेहमीच सॅटेलाइट राइट्ससाठी उच्च किंमती मिळवल्या आहेत. ‘सिंघम अगेन’ला डिजिटल प्लॅटफॉर्मने देखील प्रीमियम किंमत दिली आहे. तसेच ‘सिंघम अगेन’च्या राइट्स मोठ्या किमतीत विकले गेले आहेत. याचसोबत दिवाळीत भूल भुलैया ३ हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.
‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे बजट 250 कोटी रुपये असून, 80 टक्के बजटची पहिल्या दोन आठवड्यातच कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व कारणांमुळे ‘सिंघम अगेन’ फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटी आणि टेलिव्हिजनवरही मोठी कमाई करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान, ‘सिंघम अगेन’ नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना धमाकेदार अनुभव देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.