Iran Israel News : इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आता इराणने उडी घेतली आहे. इराणने काल इस्रायलवर 100 मिसाईल सोडल्या आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, इराणने त्यांच्या देशावर 100 हून अधिक मिसाईल डागली आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवले जात असून, नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ताबडतोब आपल्या सैन्याला इस्रायलला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बायडेन यांनी भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या आपल्या लष्करी ताफ्याला इराणच्या मिसाईल्स पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मध्यपूर्वेतील आपल्या सैन्याला सतर्क राहण्यास देखील सांगितले आहे.
इराणकडून इस्रायलवर हल्ला होण्याची भीती अमेरिकेने आधीच व्यक्त केली होती. इराण लवकरच इस्रायलवर बॅलेस्टिक हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले होते. तसेच जर इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास त्याचे ‘गंभीर परिणाम’ होतील, असा इशारा देखील दिला होता.
यावेळी अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले होते की, ‘अमेरिका इस्रायलच्या संरक्षणासाठी पाठिंबा देईल.’ तुमच्या माहितीसाठी इराणने इस्रायलवर तेव्हा हल्ला केला जेव्हा इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये घुसून, हिज्बुल्लाहविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली.
इस्रायलने हमास आणि हिजबुल्लावर केलेल्या हल्ल्यांमुळे इराण संतापला आहे. आणि म्हणून काल मंगळवारी इस्रायलवर हवाई हल्ले केल्याचे त्यांनी म्हंटले आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायलने हमासचा नेता इस्माईल हनियाची तेहरानमध्ये हत्या केली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नेता हसन नसराल्लाह याचीही हत्या केली होती. हे दोघेही मध्यपूर्वेतील इराण समर्थित मिलिशियाचे प्रमुख नेते होते. अशा परिस्थितीत त्यांचा बदला म्हणून हा हल्ला असल्याचे इराणने म्हंटले आहे.