Israel Iran Conflict : इराणने (Iran) इस्रायलवर (Israel) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अनेक देश यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर भारतानेही सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देत शांततेचा संदेश दिला आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या परिस्थितीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संवाद करून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन सादर केले आहे. त्या निवेदनात लिहिले आहे. “आम्ही सध्या बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे चिंतित आहोत. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगावा आणि नागरिकांचे रक्षण करावे.’
इस्रायली दूतावासाच्या सुरक्षेत वाढ
इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव लक्षात घेता दिल्लीतील इस्रायल दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अब्दुल कलाम रोड बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या वाहनांची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
इराणच्या हल्ल्यावर ब्रिटननेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणचा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडण्यासाठी ब्रिटनच्या लष्कराने इस्रायलला मदत केली, असे ब्रिटनच्या संरक्षण प्रमुखाने सांगितले आहे. एक्स पोस्ट करत त्यांनी लिहिले, ‘ब्रिटिश सैन्याने मध्य पूर्वमध्ये आपली भूमिका बजावली आहे. पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, ‘ब्रिटन इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करते. पुढे ते म्हणाले की, ‘इराणने मध्यपूर्वेला बराच काळ धोक्यात आणला आहे.’
दरम्यान, अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ताबडतोब आपल्या सैन्याला इस्रायलला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बायडेन यांनी भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या आपल्या लष्करी ताफ्याला इराणच्या मिसाईल्स पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मध्यपूर्वेतील आपल्या सैन्याला सतर्क राहण्यास देखील सांगितले आहे.