महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections 2024) तोंडावर आल्या असून सर्व पक्ष निवडणुकांची जोरदार तयारी करत आहेत. अनेक पक्षांच्या जागा वाटपावरून बैठक देखील सुरू आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आलेली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच एक भाष्य केले आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दहा टक्के जागा देण्यात येणार आहेत असे विधान जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवारांनी केले आहे.
भाजपचे जेष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी धुळे मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी व्होट जिहादला जबाबदार धरले होते. परंतु आता अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला आगामी निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिलेले आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार पैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महायुती तयार करण्यात आली होती परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीला फारसे यश मिळाले नव्हते.
दरम्यान, जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत देखील माहिती दिली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठीचे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 3000 रुपये देण्यात येतील असे त्यांनी सांगितलेले आहे.