Ajit Doval : जेव्हा-जेव्हा एखादे प्रकरण अडकते किंवा मोठे होते तेव्हा भारताचे NSA (National Security Agency) अजित डोवाल ते सोडवण्यासाठी उभे असतात. रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा कोणताही महत्त्वाचा करार असो भारताचे जेम्स बॉण्ड अजित डोवाल सर्वत्र दिसतात.
नुकतेच अजित डोवाल हे रशिया दौऱ्यावर होते. रशिया-युक्रेन युद्धात भारत महत्वाची भूमिका बजावत असून, यासंदर्भात डोवाल यांनी नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली आणि आता त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. मात्र, डोवाल यांनी मॅक्रॉन यांची भेट का घेतली? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मॅक्रॉन यांना भेटण्यामागे नेमके काय कारण होते? जाणून घेऊया…
डोवाल यांनी फ्रान्समध्ये जावून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेत अनेक महत्त्वाच्या करारांवर चर्चा केली. तसेच अजित डोवाल यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला दिलेल्या संदेशाचेही कथन केले. यावेळी त्यांनी भारत रशिया-युक्रेन युद्ध कसे संपवू शकतो, याची संपूर्ण योजना मॅक्रॉन यांना सांगितली.
अजित डोवाल यांनी यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती दिली. पुढे डोवाल यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना सांगितले की, ‘पीएम मोदींनी दोन्ही देशांना युद्ध संपवून संवादातून शांततेचा मार्ग शोधण्यास सांगितले आहे.
मॅक्रॉन आणि डोवाल यांच्यात काय चर्चा झाली?
अजित डोवाल केवळ पंतप्रधान मोदींचा संदेश घेऊन फ्रान्सला गेल्याचे सांगण्यात आले. डोवाल यांची फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबतची भेट यशस्वी झाली. या भेटीत रशिया-युक्रेन युद्ध आणि गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलच्या युद्धावरही चर्चा झाली. याशिवाय भारत आणि फ्रान्समधील संबंध अधिक सुधारण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींचा शांततेचा संदेश ऐकल्यानंतर आता फ्रान्सलाही वाटते आहे, रशिया-युक्रेन युद्धात केवळ भारतच सकारात्मक भूमिका बजावू शकतो. फ्रान्सचा यावर विश्वास आहे. कारण पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांना ४० दिवसांत भेटून युद्ध संपवण्यास सांगितले आहे.