राज्यात रोज अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत. कोलकाता (Kolkata), बदलापूर (Badlapur) यासारख्या ठिकाणी अत्याचाराच्या संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या घटना घडल्या. यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला. सरकारला विरोधकांकडून महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न विचारले गेले. राज्यात गुन्हेगारीच्या एका पाठोपाठ एक वाढत्या घटना पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. शहरातील विविध भागात शक्ति अभियान राबविण्यात येणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे. शक्ति अभियानामार्फत शक्ति बॉक्स हे शहरातील विविध भागात ठेवण्यात येणार आहेत. पोलिसांना काही माहिती द्यायची असल्यास शक्ति बॉक्सच्या माध्यमातून लोक आपली तक्रार पोलिसांना देऊ शकतात.
मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, निनावी फोनकॉल असा त्रास काही महिलांना, मुलींना होतो, याबाबत मुली पोलीस चौकीत जाऊन तक्रार करत नाहीत मोकळेपणाने याबाबत बोलत नाहीत यासाठी शक्ति बॉक्स उपयोगी ठरणार आहे. बारामती परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल , एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन , महिला वसतीगृह,पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ति बॉक्स म्हणजेच तक्रार पेटी ठेवण्यात येईल, अशी माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे.
बारामती शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून यावर उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत अजित पवारांनी बैठक घेतली. या बैठकीत शक्ति अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शक्ति बॉक्स म्हणजेच तक्रार पेटीत तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे. याचसोबत या अभियानामार्फत शक्ति नंबरही जारी करण्यात आला आहे.
‘एक क़ॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ‘ या अंतर्गत 9209394917 या नंबरवर कॉल करून आपण तक्रार करू शकतो असे सांगण्यात आले आहे. यावरील सेवा 24 तास सुरू राहणार असल्याची माहिती देखील अजित पवारांनी यावेळी बोलताना दिलेली आहे.