Thane : बदलापूर प्रकरणात (Badlapur Case) एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल (Uday Kotawal) आणि सचिव तुषार आपटे (Sachin Apate) यांना पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी एक महिन्यानंतर ही कारवाई केली आहे.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. अटकेच्या एक महिन्यानंतर शिंदेचा एन्काऊंटर २४ सप्टेंबर रोजी करण्यात आला. अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळा त्यानंतर आता दोघानांही अटक केली आहे.
बदलापुरातील या शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही पसार होते. या कालावधीत या दोघांनीही आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र 10 सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.
1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने दोघांचा अर्ज फेटाळून लावताना पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले. “पोलीस आधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाहीत. इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेच सापडतात, मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मात्र, अवघ्या 24 तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना अटक केली आहे.