भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना मनी लॉन्ड्रिंग(Money Laundering) प्रकरणी ईडीकडून समन्स पाठविण्यात आलेले आहेत. २० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे आता मोहम्मद अझरुद्दीन यांच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. आज ईडी समोर मोहम्मद अझरुद्दीन यांना हजर राहावे लागणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांची हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांना आपले पद जून २०२१ मध्ये सोडावे लागले होते. तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून ईडीने महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करून हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्धही मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम बांधकामामध्ये गैरव्यवहार केल्याचे आरोप करत ईडीकडून तीन एफआरआय दाखल केलेले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम बांधकामावेळी डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि छत खरेदीसाठी वाटप करण्यात आलेल्या २० कोटी रुपायांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे सांगण्यात आलेले आहे. या प्रकरणीच मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप असून त्यांना ईडीने समन्स पाठविलेले आहे.
भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने मोहम्मद अझरुद्दीन यांनी खेळलेले आहेत. कसोटीत ४५.०४ च्या सरासरीने ६२१५ धावा तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६.९२ च्या सरासरीने ९३७८ धावांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी १२ विकेट्स केल्या असून कसोटीमध्ये त्यांनी २२ शतके आणि २१ अर्धशतके केली आहेत. १९९२, १९९६ आणि १९९९ मध्ये तीन एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्वही मोहम्मद अझरुद्दीन यांनी केले आहे.
दरम्यान, 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. कॉँग्रेसच्या तिकिटावर ते 2009 मध्ये मुरादाबाद, युपी येथून खासदार झाले होते.