शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी(Tuljabhavani Temple) मातेच्या जागराला देखील सुरुवात करण्यात आली आहे. देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. घरोघरी या नवरात्रींमध्ये घटस्थापना देखील केली जाते. आज 12 वाजता विधिवत घटस्थापना करून तुळजापूरमध्ये (Tuljapur) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे.
तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज आई राजा उदो उदो च्या निनादात नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे. या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचा देवी शैलपुत्रीचा अवतार मानला जातो. देवीच्या या पहिल्या रुपाचे म्हणजेच देवी शैलपुत्रीची पूजा देखील केली जाते.
नवरात्रीमध्ये राज्यातील हजारो भाविक तुळजापूरमध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात. तुळजापूरमधील या तुळजाभवानी मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक विधी होतील असे सांगण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी रोज रात्री छबिना निघणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.
दरम्यान, नवरात्रीच्या या कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थानाने जोरदार तयारी केलेली आहे. यासाठीच मंडप उभारण्यात आला आहे. महाद्वारावर देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.