भारतात म्यानमारचे रोहिंग्या निर्वासित नाहीत, तर ते घुसखोर आहेत. त्यांच्या मुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्याद्वारे केल्या जाणाया बेकायदेशीर कृत्यां मुळे सुरक्षेला धोका निर्माण होत आहे, असे प्रतिपादन भारतीय वायू सेनेचे निवृत्त अधिकारी एअर मार्शल प्रदीप बापट यांनी आज शिवणे, पुणे, येथे केले.
गीताई ह्यूमनकाईंड डेव्हलोपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या ‘सेवा पंधरवडा’ निमित्ताने रामेलेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. “राष्ट्रीय सुरक्षा” ह्या विषयावर बोलताना एअर मार्शल म्हणाले की “देशात होणाऱ्या सगळ्या विघातक कार्याकडे दृष्टीआड करून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत सुरक्षेत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.”
एअर मार्शल बापट म्हणाले की काही लोक रोहिंग्याच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती आणि चिंता व्यक्त करत आहेत हे अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. “भारतात रोहिंग्या मुसलमानांची संख्या वाढत आहे. हे निर्वासित म्हणून भारतात आले पण अनेकांचे बेकायदेशीर रित्या आगमनामुळे भारतीय नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर विपरीत परिणाम होणार आहे.”
काही रोहिंग्या बेकायदेशीर आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत जसे की हुंडी किंवा हवाला द्वारे निधी गोळा करणे, इतर रोहिंग्यांसाठी बनावट भारतीय ओळखपत्रे मिळवणे आणि मानवी तस्करीमध्ये गुंतणे. गेल्या काही दिवसात भारताच्या विविध ठिकाणी रोहिंग्यांना बेकायदेशीर कृत्ये करताना पकडले आहे, त्याच अनुषंगाने एअर मार्शल बापट म्हणाले: “भारतात अनेक रोहिंग्या मुसलमान अवैधरित्या राहत आहेत. त्यांना मतपेटी या दृष्टीने बघून वोटिंग कार्ड दिले जात आहे. ते वेगवेगळ्या गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहेत, ते स्थानिक आणि मूलनिवासी लोकांचे रोजगार घेत आहेत.”
“आपल्या शेजारी कोण राहत याची आपल्याला माहिती असावी, ‘स्लीपर सेल’ नाही ना याची खात्री करावी. घुसखोरांना बाहेर काढल्याने भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत होईल आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल. पण हे सर्व करण्याकरिता नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे,” असे ते म्हणाले. बांगलादेश मध्ये अनेक निष्पाप हिंदूंना क्रूरपणे मारण्यात आले, आणि असेही आढळून आले की त्यांचा (रोहिंग्यांचा) दहशतवादी संघटनांशी संबंध आहे.
“आज बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चालू आहेत त्या प्रकारचे अत्याचार काश्मीरमध्ये १९९० साली झाले. ३७० कलमाच्या आड अनेक वाईट गोष्टी घडल्या. पण गेल्या पांच वर्षात ३७० कलम काश्मीरमधून काढल्यामुळे सकारात्मक फरक पडला आहे,” असेही ते म्हणाले.
भारत सरकारने सुरक्षिततेच्या दिशेने उचललेली काही पावले स्तुत्य आहे असे ते म्हणाले. “दहशतवादाला शून्य सहिष्णुता (zero-tolerance) हे चांगले धोरण आहे. त्याच बरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अंतरीक सुरक्षेसाठी करायला हवा. “
उत्तरप्रदेशचे उदाहरण देत ते म्हणाले, आंतरिक सुरक्षा चांगली असेल तर उद्योगक्षेत्र वाढते, रोजगार निर्माण होतात व आर्थिक भरभराट होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही या प्रकारचे धोरण राबवणाऱ्या सरकारची आवश्यकता आहे.
एअर मार्शल बापट यांनी सुरक्षा दलाची आधुनिकता करण्याचे पण अत्यंत आवश्यक आहे असे सांगितले. भारतात केवळ उत्पादन क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रातही उदयोजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेला ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम खूप महत्वाचा असल्याचे सांगितले. “गेल्या सात-आठ वर्षांत सरकारने केवळ संरक्षण अर्थसंकल्पातच वाढ केली नाही तर देशातील संरक्षण उत्पादन परिसंस्थेच्या विकासाकडे पण तेवढंच लक्ष दिलें. गेल्या ४-५ वर्षांत संरक्षण आयातीत सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली आहे. आज आपण सर्वात मोठ्या संरक्षण आयातदाराकडून सर्वात मोठ्या निर्यातदाराकडे वेगाने वाटचाल करत आहोत,” असा ते म्हणाले.
गेल्या वर्षी सुमारे १३,००० कोटी रुपयांची संरक्षण निर्यात झाली, त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक खाजगी क्षेत्रातून झाली आहे.
गीताई संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश जोगदंड यांनी बापट यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.