राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बारामतीमध्ये पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी एखाद्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींचे वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार सुरू आहे असे वक्तव्य केलेले आहे. हा विषय केंद्राशी निगडित असल्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी अल्पवयीन आरोपीच्या याबाबत चर्चा करणार आहे. तसेच लवकरच याबद्दल केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. या पत्राच्या माध्यमातून अल्पवयीन गुन्हेगाराचे वय जरी १४ वर्षाखालील असेल तरी त्याला गुन्हेगार मानले जावे अशी मागणी आम्ही सरकारच्या वतीने करणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी आज बारामतीत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली आहे. चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवक हा गुन्हेगार गणला जावा अशी चर्चा या बैठकीत झाली आहे.” सध्या 18 पेक्षा कमी वय असलेल्या गुन्हेगारांना अल्पवयीन समजले जाते. यामुळे मुलांना कळून चुकले आहे की १८ पर्यंत आपण गुन्हात अडकू शकत नाही. यामुळेच अलीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे म्हणूनच आता हे वय 18 वरुन 14 करण्यात यावे यासाठी मी अमित शाह यांच्याशी बोलणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी देखील याबाबत चर्चा करणार आहे. यानंतर केंद्र सरकारला पत्र देऊन या बाबतचा प्रस्ताव देणार आहे,” असे वक्तव्य अजित पवारांनी केलेले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एक नंबरची मुलगी चांगल्या नोकरीवाल्यांना मिळते, दोन नंबरची मुलगी पान टपरी आणि किराणा माल दुकानदारांना मिळते तर तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते” असे वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यावरुन आता अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याला काल रात्री फोन करून या बाबत मी समज दिली आहे असे देखील अजित पवारांनी सांगितलेले आहे.