Adani Group-Google Tie-UP : अदानी ग्रुपशी संबंधित एका मोठ्या डीलची बातमी समोर आली आहे. अदानी समूहाने (Adani Group) दिग्गज टेक कंपनी गुगलसोबत एक करार केला आहे. यासंबंधितची घोषणा गुगलने (Google) ‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमात केली आहे. तर अदानी ग्रुपने देखील एक निवेदन सादर करत याबाबत माहिती दिली आहे.
या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या 30 गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
कोणत्याही डेटासेंटरला मोठ्या प्रमाणात वीज लागते. ही वीज हरित उर्जा (अशी ऊर्जा आहे जी नैसर्गिक पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवणारी एक पद्धत वापरून आणि स्त्रोतापासून तयार केली जाऊ शकते.) प्रकल्पातून निर्मित असल्यास ते डेटा सेंटर देखील हरित डेटा सेंटरच्या यादीत सामील होते. अशा स्थितीत गुगलने आपली सगळी डेटा सेंटर हरित उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या याच निर्णयाला आता अदाणी समूहाची साथ मिळणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2025 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अदाणी समूहाच्या या जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं वीज निर्मीती सुरु होईल.
या प्रकल्पातून 81 दशलक्ष युनिट हरित वीज निर्मिती होणार असून जवळपास 1 कोटी 61 लाख कुटुंबांना या प्रकल्पातून सौर उर्जा पुरवठा होणार आहे. याच प्रकल्पातून गुगललाही वीज पुरवठा होईल.
या भागीदारीबाबत अदानी समूह काय म्हणाला?
“या भागीदारीद्वारे, अदानी गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित प्रकल्पातून हरित वीज पुरवठा करेल,” या नवीन प्रकल्पाचे व्यावसायिक ऑपरेशन्स 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. हा करार Google च्या 24/7 कार्बन-मुक्त ऊर्जा उद्दिष्टे पुढे नेण्यास मदत करेल आणि भारतातील हरित उर्जेसह त्यांच्या ‘क्लाउड’ सेवांना समर्थन देईल.’