Iran Israel News : इराणने (Iran) इस्रायलवर (Israel) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे भारतातील राजदूत, रूवेन अझर (Reuven Azar) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इराणने ही सर्वात मोठी चूक केली असून त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे त्यांनी म्हंटले आहे. पुढे त्यांनी, इराणचा इस्रायलवरील हल्ला अयशस्वी झाला असून, इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणचा हा हल्ला हाणून पाडला असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
एएनआयशी बोलताना रूवेन अझर म्हणाले, “आमच्या पंतप्रधानांनी सांगितल्या प्रमाणे इराणला याची किंमत मोजावी लागेल, पुढे ते म्हणाले, इराणने केलेल्या या हल्ल्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे कारण इराण सारखी धूर्त राज्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने देखील हल्ला करू हे आपल्यासाठी धोक्याचे आहे. जर याला आळा घातला गेला नाही तर त्याचे परिणाम भयंकर होतील. जर कोणी इराणला रोखणार नसेल तर ती आपली जबाबदारी आहे, असे देखील रूवेन अझर यावेळी म्हणाले.
पुढे इराणचा हल्ला हाणून पाडण्याबाबत ते म्हणाले, “इराणचे हल्ले अयशस्वी करण्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो कारण आमच्याकडे जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण यंत्रणा आहे. आणि दुसरे कारण म्हणजे आमचे युनायटेड स्टेट्सबरोबर असलेले चांगले संबंध. तुमच्या माहितीसाठी अमेरिकेने देखील इराणने सोडलेले मिसाईल्स हवेतच नष्ट करण्यात इस्रायलची मदत केली होती. ज्यासाठी रूवेन अझर यांनी अमेरिकेचे देखील आभार मानले आहे.
पुढे, अझर यांनी जोर दिला की, मध्य पूर्वेतील देश स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दहशवादी संघटनांना आश्रय देतात, हे देश स्वतःचा बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहेत. मात्र, आम्ही याला समर्थन करत नाही, यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करण्याचा आम्ही दृढनिश्चय केला आहे. असेही अझर यावेळी म्हणाले आहेत.
गेल्या आठवड्यात बेरूतमध्ये हिजबुल्लाह दहशवादी संघटनेचे प्रमुख हसन नसराल्लाह याची हत्या केल्यानंतर आणि 31 जुलै रोजी तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हनीयेह याच्या हत्येला उत्तर म्हणून इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सोडल्याचे म्हंटले आहे. इराणने हा हल्ला बदलापोटी घेतला असल्याचे कबूल केले.
इस्त्रायली सैन्याच्या अहवालानुसार, इराणने केलेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले कारण बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच उडवण्यात आले होते. इराणने इस्त्रायची राजधानी तेल अवीव वर लक्ष करत मिसाईल्स सोडले होते.
या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ताबडतोब बदला घेण्याचे वचन दिले आणि इराणने ही सर्वात मोठी चूक केली केली असल्याचे म्हणत त्यांना याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला.