अखेर मराठी भाषेला काल (गुरुवारी) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी कौतुक केले असून, महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी देखील ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शरद पवार म्हणाले, ‘अभिजात भाषेचा दर्जा देण्यास उशीर झाला असला तरी निर्णय झाला आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.’
पुढे शरद पवार म्हणाले, ‘मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने प्रत्येक मराठी माणसांचे समाधान झाले. गेले अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून मागणी होती. ती महाराष्ट्र सरकारने, साहित्य संस्थांनी केली होती.
साहित्य परिषदेमध्ये, मराठी साहित्य संमलेनामध्ये ठराव करून ही मागणी केली होती. माझ्या सारख्या लोकांनी यासाठी व्यक्तिगत पातळीवर केंद्र सरकारला आग्रह केला होता, असे देखील शरद पवार म्हणाले.
पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे महत्त्व म्हणजे मराठी भाषा म्हटल्यानंतर यापूर्वी मराठी भाषेत जेजे लिखाण झाले ते लोकांच्या निदर्शनास आले नाही ते निदर्शनास येण्याचा मार्ग खुला झाला. अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने प्रत्येक वर्षी सरकारकडून या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसाह्य देण्याची तरतूद आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील सोशल मीडियावरील X वर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेल्या कित्येक वर्षांचा मराठी भाषिकांचा लढा, मागल्या अनेक सरकारांचा केंद्रासोबतचा पत्र व्यवहार, मविआ सरकारच्या काळात केलं गेलेलं दस्तावेजीकरण आणि तमाम मराठी मनांच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे अखेर केंद्र सरकार झुकले आणि निवडणुकांच्या तोंडावर का होईना आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला! जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन! असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.
काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत मराठी सोबतच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या भाषांना देखील ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.