तिरुपती (Tirupati ) मंदिरातील प्रसादाच्या लाडू भेसळीचा वाद काही थांबताना दिसत नाहीये. या वादावर आता सर्वोच्च न्यायालयाने (High Court) मोठा निर्णय दिला आहे. आपला निर्णय देताना हा करोडो लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय एसआयटी (SIT Investigation) स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या टीममध्ये सीबीआय, पोलिस आणि एफएसएसएआयचे अधिकारी असतील. याचा अर्थ आता राज्य एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांची मदत मागितली होती, राज्य सरकारची एसआयटी या तापासाठी पुरेशी आहे का की अन्य एजन्सीने चौकशी करावी? हे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगावे.
दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला सुचवले की, SIT तपासावर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष ठेवले पाहिजे.’
यावर आता कोर्टाने म्हटले की, ‘आम्ही स्पष्ट करतो की, आम्ही आरोप आणि प्रत्यारोप करण्यात रस दाखवणार नाही. तसेच न्यायालयाच्या कामात राजकीय वापर होऊ देणार नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये सीबीआय, राज्य पोलीस आणि एफएसएसएआयचे अधिकारी असतील. कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेपोटी हा निर्णय घेतल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय संचालकांच्या देखरेखीखाली होणार असून या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास संस्थेमार्फत (एसआयटी) करण्यात येणार असल्याचे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणावर एसजी तुषार मेहता म्हणाले की, ‘एक गोष्ट स्पष्ट आहे की या आरोपात काही तरी तथ्य असेल तर ते अमान्य आहे. कारण देशभरातील भाविकांच्या अन्नसुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होतो. मला एसआयटी सदस्यांविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसआयटीवर नजर ठेवावी, यामुळे विश्वास वाढेल. असे तुषार मेहता यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, या प्रकरणाची निःपक्षपाती संस्थेमार्फत चौकशी झाली पाहिजे. काल याप्रकरणी आणखी एक निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले नसते तर गोष्ट वेगळी असती. अशा स्थितीत न्यायालयाने निष्पक्ष स्वतंत्र तपासाचे आदेश द्यावेत. असे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी न्यायालयाने एसआयटीऐवजी स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती.
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा धक्कादायक खुलासा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर आपल्या कार्यकाळात प्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणाची आता चौकशी केली जात आहे.