इस्रायल(Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सध्या चालू असलेल्या युद्धामुळे लेबनॉनच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी रॉकेट, मिसाइल्स आणि मोठ्या प्रमाणात बॉम्बचा देखील वापर केला जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर(Lebanon) एका पाठोपाठ एक हल्ले केले जात आहेत. इस्रायलने हिज्बुल्लाहवर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाह संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याला आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनानंतर हिज्बुल्लाहने हाशिम सफिद्दीन ( Hashim Saffiedine) यांची हिजबुल्लाह संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. परंतु इस्रायलने काल केलेल्या हल्ल्यात हाशिम सफिद्दीन देखील ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
इस्त्रायलने बेरूत शहरावर गुरुवारी हवाई हल्ला केला आहे. यावेळी सफीद्दीन हा बंकरमध्ये हिजबुल्लाहच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होता. या हल्ल्यात अनेक अधिकारी आणि हाशिम सफिद्दीन मारला गेला असल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात हाशिम सफिद्दीन यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त इस्त्रायलमधील मीडियाने दिलेले आहे. इस्रायलने बंकरमध्ये केलेल्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला अतिशय भीषण होता असे मीडियाकडून सांगण्यात येत आहे. परंतु हाशिम सफिद्दीन ठार झाल्याच्या वृत्ताला अद्याप इस्त्रायल सरकारने दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, अमेरिकेने हाशिम सफिद्दीन याला २०१७ मध्ये दहशतवादी जाहीर केले होते. नसरल्लाह आणि नईम कासिम यांच्यानंतरचा हिजबुल्लाह संघटनेचा हाशिम सफिद्दीन हा प्रमुख नेता होता. हाशिम सफिद्दीन हा पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असल्याचे म्हटले जाते. तसेच तो दहशतवादी संघटनेच्या जिहाद परिषदेचा सदस्य देखील होता.