शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune) एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडत आहेत. स्कुलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता हृदय पिळवटून टाकणारी घटना( Pune Crime News) समोर आली आहे. पुण्यातील बोपदेव घाटात आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर तीन जणांनी लैगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
20 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. याठिकाणी एका कारमधून ३ मुले आली आणि त्यांनी मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत या तरुणीचे आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. यानंतर त्या तरुणीला आपल्या कारमध्ये बसवून येवलेवाडी भागात नेले आणि या ठिकाणी तिच्यावर तीन जणांनी लैगिक अत्याचार केला. यानंतर त्यांनी या तरुणीला खडी मशीन चौकात सोडून दिले आणि ते तिघे पसार झाले. या प्रकरणी तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी यातील आरोपी राजेखां करीम पठाण याच्यांसोबत आणखी तिघांना अटक केली आहे.
आता या घटनेचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शबाना शेख करत आहेत. पोलिसांकडून बोपदेव घाटात गस्त सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे. दरम्यान, या घटनेवरून आता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्व नागरिकांनी केलेली आहे.
या घटनेवरून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने आणखी ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे