उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मिर्झापूर(Mirzapur) येथे धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री मिर्झापूर येथे भीषण अपघात झाला आहे. भदोही जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील ३ जण गंभीर जखमी असून १० जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
भरधाव येणाऱ्या ट्रकने पहिल्यांदा दुचाकीला धडक दिली होती. यानंतर टॅक्टर आणि ट्रॉलीला या ट्रकने धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर आणि ट्रॉली शेजारी असणाऱ्या नाल्यात पलटी झाली. या ट्रॅक्टरमध्ये १३ मजूर होते. हे सर्वजण तिवारी गावातून कामावरून परतून आपल्या घरी वाराणसीला चालले होते.
या घटनेबाबत “आज रात्री 1 वाजण्याच्या सुमारास, या अपघाताची माहिती मिळाली होती. यानंतर आमची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली, यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती आणि अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वाराणसीला पाठविण्यात आले. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांवर बीएचयूमध्ये उपचार चालू आहेत अशी माहिती मिर्झापूरचे एसपी अभिनंदन यांनी दिली आहे.
दरम्यान, आता या अपघातातील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगृहात पाठविलेले आहेत. तसेच ट्रक ताब्यात घेण्यात आला असून ट्रक चालक फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे अशी माहिती एसपी अभिनंदन यांनी सांगितली आहे.