Mumbai News : मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirval) यांनी मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचे मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये अशी या आंदोलनकर्त्या आमदारांची मागणी आहे.
आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदारांनी मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उद्या मारल्या. आणि तेथेच बसून आंदोलन सुरु केले. दरम्यान, आता जाळीवर आंदोलन करणाऱ्या आमदारांना जाळीवरुन सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे. यानंतर आमदारांनी मंत्रालयातच आपले ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
#WATCH | NCP leader Ajit Pawar faction MLA and deputy speaker Narhari Jhirwal jumped from the third floor of Maharashtra's Mantralaya and got stuck on the safety net. Police present at the spot. Details awaited pic.twitter.com/nYoN0E8F16
— ANI (@ANI) October 4, 2024
काय आहेत मागण्या?
धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर सरकारकडून काढण्यात येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांचा विरोध आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षणाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. धनगरांना एसटी प्रवर्गातून नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची आदिवासी आमदारांची भूमिका आहे. आदिवासी समाजाच्या याच प्रश्नांसाठी आमदार नरहरी झिरवळ हे आंदोलन करत आहेत.
नरहरी झिरवाळ यांची नेमकी मागणी काय?
सरकारने धनगर सामाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारही आंदोलनात सहभागी झाले आहेत. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. असं झिरवळ म्हणाले होते.
दरम्यान, नरहरी झिरवाळ हे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. मात्र, तेथे त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे. यानंतर आज ते पुन्हा मंत्रालयात पोहोचले, तेथेही त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही आणि म्हणून या रागातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.