आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना सर्व पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या ( ५ ऑक्टोबर ) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान वाशीमला पोहरादेवी येथे दर्शनासाठी उद्या सकाळी १० वाजता पोहचणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगदंबा देवी, सेवालाल महाराज, रामराव महाराज यांचे देखील दर्शन घेणार आहेत. तसेच ठाणे शहरात (Thane ) उद्या (५ ऑक्टोबरला ) पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासनाने पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशीम दौऱ्यावर येणार असून त्यांच्या ह्या दौऱ्यामुळे वाशीमच्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. पोहरादेवीत खास मानाची पगडी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तयार केली गेली आहे.
बंजारा समाजात पगडीला अतिशय महत्वाचे मानले जाते. पंतप्रधानांना देण्यात येणारी हि पगडी मध्यप्रदेशमधून पोहरादेवीत आणली गेली आहे. याचसोबत चांदीचे कडे आणि बंजारा समाजाचा पट्टा महंतांकडून पंतप्रधानांना भेट देण्यात येणार आहे. तसेच बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण उद्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळेच उद्याचा दिवस हा बंजारा लोकांसाठी सुवर्ण दिवस ठरणार आहे असे म्हटले जात आहे. नवरात्रीमध्ये मी येणार आहे असा शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला होता यामुळेच आता उद्या पंतप्रधान येणार आहेत अशी माहिती महंत बाबूसिंग महाराज यांनी दिलेली आहे.
दरम्यान, उद्या पंतप्रधानांसोबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड देखील उपस्थित राहणार आहेत.